संत जगनाडे, संत गवरशेठ महाराजांच्या पालख्या उद्यमनगरीत
Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011
Under: News
पिंपरी - श्री क्षेत्र सुदुंबरे येथील संताजी जगनाडे महाराज आणि श्री संत गवरशेठ महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी उद्यमनगरीत रात्रीच्या मुक्कामासाठी विसावल्या. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत या दोन्हीही पालख्या शनिवारी (ता. 25) सकाळी मार्गस्थ होणार आहेत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी श्री संताजी जगनाडे महाराज आणि श्री संत गवरशेठ महाराज यांच्या पालख्या अनुक्रमे चिंचवड स्टेशन आणि प्राधिकरण येथील श्री मल्लिकार्जुन देवालयातून सकाळी मार्गस्थ झाल्या. जगनाडे महाराज पालखी कासारवाडी येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोचली. त्या ठिकाणी स्थानिक नागरिक सदाशिव लांडे परिवारामार्फत दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहर तेली समाज संघटनेमार्फत रात्री वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या प्राथमिक शाळेत पालखीचा मुक्काम असणार आहे. पालखी सोहळाप्रमुख वनारसी राऊत, विश्वस्त नारायण क्षीरसागर, दत्तात्रेय धोत्रे, अरुण काळे, अनिल राऊत या पालखी सोहळ्याच्या नियोजनाचे काम पाहत आहेत. सकाळी आठ वाजता ही पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.
श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी समाधी प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आयोजित श्री संत गवरशेठ यांच्या पालखीचे मुंबई-पुणे महामार्गावरून, पिंपरी चौक मार्गे पिंपरी कॅम्प येथे दुपारी तीन वाजता आगमन झाले. निगडी येथे काळुराम भोंडवे यांच्यामार्फत सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. मनोहरशेठ गदिया यांच्या निवासस्थानी या पालखीचा मुक्काम राहणार आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा पालखी सोहळा पुण्याकडे निघणार आहे. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार, पालखी सोहळाप्रमुख बाळासाहेब गाडे-पाटील आणि विश्वस्त सुरेश वाळके पालखी नियोजनाचे काम पाहत आहेत.
In : News