Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011
Under: News
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नऊ दिवसांचा सुमारे तीनशे किलोमीटरचा प्रवास करत श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व उद्या बुधवारी (ता. २२) संध्याकाळी आळंदीत दाखल होणार आहेत.
माउलींच्या पालखी सोहळ्यात परंपरेने कर्नाटकातील अंकली गावचे शितोळे सरकार यांचे मानाचे दोन अश्व येतात. त्यामध्ये एक स्वाराचा आणि दुसरा माउलींचा अश्व असतो. पालखी सोहळ्यात भोई दिंडीमागे हे दोन्ही अश्व चालतात. त्यामागे इतर सोहळा चालतो.
अंकली गावात ऊर्जितसिंह शितोळे यांनी पूजा केल्यानंतर हे अश्व आळंदीच्या दिशेने पुढे निघतात. म्हैसाळ, सांगलवाडी, पेठनाका, वाहगाव, भटनगाव, भुईंज, शिरवळ, शिंदेवाडी, पुणे असा प्रवास माउलींच्या अश्वांनी केला. सोमवारी (ता. २०) हे अश्व पुण्यात दाखल झाले आहेत. रास्ते वाड्यात कालपासून ते मुक्कामी आहेत. उद्या (बुधवारी) दोन्ही अश्व आळंदीत संध्याकाळी दाखल होतील.
In : News