वारीतला अवघा बळीराजा सुखावला
Posted by विलास काटे - सकाळ वृत्तसेवा on Friday, July 8, 2011
Under: News
| सलग तीन दिवस पाऊस - आनंदाचे डोही आनंद तरंग. वेळापूर - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर गेली तीन दिवसांपासून वरुणराजा बरसला. पावसामुळे गेल्या आठवडाभरात उकाड्याने हैराण झालेला वारकरी पाऊस आणि भक्तिरसात चिंब झाला. काहीशा काळजीत असलेल्या वारीतील बळीराज्याच्या चेहऱ्यावर होता तो आनंद, आनंद आणि आनंदच. सुखावलेल्या बळीराजाला आता गावाकडच्या शेतातील पेरणीची काळजी राहिली नाही. सोहळा आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यावर सासवडपासून वारकरी उकाड्याने हैराण होते. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती फक्त पावसाची. अनेक वारकरी मोबाईलवरून गावाकडे पावसाबाबत सतत विचारणा करताना दिसत होता. माऊली आळंदीतून निघाल्यावर पाऊस सुरू होईल, या आशेने उभ्या महाराष्ट्रातून आलेला बळीराजा पंढरीची वाट चालत होता. मात्र, वारीतील अर्ध्याहून अधिक अंतर गेल्यानंतरही सोहळ्यात पाऊस लागला नाही. त्यामुळे मनात विठुरायाची ओढ असली तरी विश्रांतीच्या वेळी काळ्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नव्हती. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा येत होता. मात्र, लगेच ऊन पडत असल्याने बळीराजा काळजीत होता. मात्र, मंगळवारपासून (ता.4) पालखी नातेपुतेत येत असताना सायंकाळी जोरदार पाऊस पडला. त्यानंतर दोन दिवस दिवसभरच्या वाटचालीत अधूनमधून उकाडा तर पावसाची सरी असा हवामानातील बदल वारकऱ्यांना जाणवत होता. कालही दुपारी पालखी निमगाव पाटीवर जेवणासाठी थांबली. मात्र, मधेच पाऊस पडल्याने वारकऱ्यांना हातात जेवण घेऊन जेवण उरकावे लागले. मात्र, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील पावसाबाबतची चिंता मात्र पुरती मिटली होती. सलग तीन दिवस पाऊस आल्याने वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता बळीराजाची चिंता मिटली असून गावाकडच्या शेतातील पेरणी खुशाल करू, अशीच भावना लाडक्या विठुरायाकडे तो व्यक्त करत होता. |
In : News