आळंदी - आषाढी वारीच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आळंदीत येऊ लागले आहेत. यात मराठवाडा, सोलापूर, खानदेशातील वारकऱ्यांची संख्या जास्त आहे. आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर दुकानदारांची माल भरण्याची लगबग सुरू झाली आहे.

दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीतून माउलींचा पालखी सोहळा पंढरपूरला जाण्यासाठी निघतो. यंदा पालखी प्रस्थान सोहळा गुरुवारी (ता. 23) रात्री होणार आहे. दरम्यान, घराण्यात परंपरागत चालत आलेली वारी पुढे कायम ठेवत भाविक वारकरी सध्या मिळेल त्या वाहनाने अथवा खासगी वाहने ठरवून आळंदीत येत आहेत. दिंडीकऱ्यांची वाहने आळंदीत दाखल होऊ लागली आहेत. ठिकठिकाणी मोकळ्या जागेत वारकऱ्यांची निवाऱ्यासाठी राहुट्या, तंबू उभारण्याची लगबग चालू आहे. अनेक फडकरी, दिंडीकरी आजही तंबू, राहुट्यांनाच पसंती देतात. धर्मशाळांमध्येही वारकरी उतरले आहेत. वारीसाठी मराठवाडा, खानदेश, सोलापूर जिल्ह्यातून विशेष गर्दी सध्या दिसून येते. कोकण भागातील वारकऱ्यांची संख्याही मोठी आहे.

मंगळवारपासून वारकऱ्यांचे नित्यनेम चालू झाले असून, अनेकांनी ज्ञानेश्‍वरीचे पारायण चालू केले आहे. प्रस्थानादिवशी दुपारनंतर दर्शन बंद होत असल्याने अनेक भाविक दोन दिवस आधी समाधी दर्शनासाठी येतात. वारकऱ्यांच्या आगमनामुळे शहरात टाळमृदंगाचा गजर ऐकू येऊ लागला आहे. यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे वारीसाठी गर्दी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

दर्शनबारीची उभारणी

देवस्थानच्या वतीने इंद्रायणीच्या तीरावर दर्शनबारी उभारण्याचे काम चालू आहे. याशिवाय आजोळघरात मंडप टाकला असून, रामवाड्यातही दर्शनबारी उभारली आहे. नदीला पूर आल्यास आपत्कालीन काळात दर्शनबारी झाडी बाजारातून नवीन पुलावरून वळविण्यात येणार आहे. रात्री बाराच्या दरम्यान प्रस्थान असल्याने या वर्षी देवस्थानने प्रदक्षिणा रस्ता आणि गावठाणात हॅलोजन दिवे लावले आहेत. प्रदक्षिणा रस्त्यावर घुंडरे गल्ली, भैरोबा चौक येथे वारकऱ्यांना मंदिरातील प्रस्थान काळातील क्षणचित्रे दाखविण्यासाठी "स्क्रिन'ची सोय करण्यात येणार आहे.
सध्या इंद्रायणी नदीला मुबलक पाणी सोडण्यात आले आहे. शहरात रस्त्यांतील खड्ड्यांमधे मुरूम टाकून डांबरीकरणाचे काम चालू आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेची दुकाने पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आली आहेत. मात्र, मंदिर परिसर आणि पालिका चौकात मात्र अतिक्रमणे कायम आहेत. रस्त्यांवरील दिव्यांची दुरुस्तीही करण्यात आली. या वर्षी प्रस्थान रात्री उशिरा होणार असल्याने चोऱ्या होऊ नयेत यासाठी रस्त्यांवर पालिकेने हॅलोजन दिवे लावले आहेत. वारी काळात चोवीस तास पाणीपुरवठा करणार असल्याचे यापूर्वीच पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले. विद्युत विभागातील दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.

वारकऱ्यांना रॉकेल वाटप

भाविकांच्या आगमनामुुळे शहरात दुकाने थाटणाऱ्या व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. तबला, पेटी, टाळ, मृदंग, याचबरोबर नारळ, प्रसाद विक्रेते यांची दुकाने मांडणीची तयारी सूरू झाली. वारी काळात मंगळवारपासूनच वारकऱ्यांना रॉकेल वाटप करण्याची सूचना महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दिंडीवाल्यांसाठी घरगुती दरानेच स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर पुरविण्याचा आदेश नुकताच प्रांताधिकाऱ्यांनी दिला होता. यानुसार संपूर्ण वारीकाळात पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांना सिलिंडर पुरविण्यात येणार आहे.

जड वाहतूक अद्याप सुरूच

आळंदी पोलिसांनी रविवारपासून (ता. १९) शहरातील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्याप ही सुरूच आहे. मरकळ औद्योगिक विभागाकडे जाणारी वाहने शहरातून जात आहेत. लग्नांसाठी आलेल्या वऱ्हाडींची वाहनेही अद्याप रस्त्याच्या दुतर्फा उभी आहेत. महाद्वारातही गाड्या लागलेल्या आहेत. वारकऱ्यांना चालणेही मुश्‍किल झाले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे. पोलिसांकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. दूरध्वनी यंत्रणा सोमवारी वायर तुटल्याने बंद पडली. त्यामुळे शहरातील सर्व बॅंकांचे कामकाजही थांबले.