पिंपरी - संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना विविध सामाजिक संस्था-संघटनांमार्फत अन्नदान, मोफत औषधे यासारख्या सेवा पुरविण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड आयुर्वेदीय औषध विक्रेता संघाच्या वतीने (आरोग्यप्रभा) संत तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना भक्ती-शक्ती चौकात मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सोपान कामठे, उपाध्यक्ष किरण सूर्यवंशी, सचिव प्रशांत गोलांडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

आकुर्डी येथील सिद्धिविनायक महिला संस्था आणि आदर्श मित्र मंडळातर्फे माजी नगरसेविका वृषाली मोरे यांच्या हस्ते वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले, तर शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे प्राधिकरण येथे संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्यातील दिंडीला अन्नदान करण्यात आले; तसेच वारकऱ्यांना मोफत दूरध्वनी, केस-दाढी, कटिंग यासारख्या सेवा पुरविण्यात आल्या. भाविक देशमुख यांनी याचे संयोजन केले.

निगडी येथील संस्कृती संवर्धन व विकास महासंघामार्फत आकुर्डी येथे वारकऱ्यांना तांदूळ, मूगडाळ यासारख्या शिधाचे वाटप करण्यात आले. रविकांत कळंबकर, विजय निमक, रमेश हवेली यांनी याचे संयोजन केले.