सर्व आजारांवरच्या औषधांचा साठा उपलब्ध, ६९ उपहारगृहाची तपासणी

शेटफळगढे - इंदापूर तालुक्‍यात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंचायत समितीचा आरोग्य विभाग सर्व तयारीनिशी सज्ज झाला आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी किरण जाधव व तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत महाजन यांनी दिली.
या वेळी बोलताना श्री. महाजन म्हणाले, तालुक्‍यात २ ते ६ जुलै या काळात हा सोहळा होणार आहे. याकरिता पालखी मार्गावर येणाऱ्या ५ प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० उपकेंद्रातही सर्व आजारांवरच्या औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.

पालखी मार्गावरील एक किलोमीटर अंतराच्या परिसरातील २२७ विहिरींचे टीसीएल टाकून दररोज शुद्धीकरण करण्यात येत आहे. तसेच, पाण्याच्या शुद्धतेची दररोज चाचणी घेतली जात आहे. पाणी शुद्धीकरणाचे हे काम पालखी तालुक्‍यातून ६ जुलैला गेल्यानंतरही आणखी दोन दिवस चालणार आहे. पालखी मार्गावरील ३९६ बोअरवेलच्या बाबतीतही पाणी शुद्धीकरणासाठी हीच प्रक्रिया राबविली जात आहे.

पालखी मार्गावर असलेल्या ६९ उपाहारगृहांची आरोग्य खात्याच्या वतीने तपासणी करण्यात आली असून, यांच्या मालकांना स्वच्छतेबाबत आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपहारगृहातील कर्मचाऱ्यांचीही वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली आहे. पालखी मार्गावर ८ ठिकाणी टॅंकर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. शिवाय या ठिकाणी स्वतंत्र्य आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायतींना टीसीएलचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी डासांपासून आजार बळावू नयेत, याकरिता कीटकनाशक धुरळणी करण्यात येत आहे.

भवानीनगर ते सराटीपर्यंत फिरते औषध उपचार केंद्र पालखी समवेत राहणार आहे. त्याचबरोबर १६ वैद्यकीय अधिकारी, १० आरोग्य सहायक, १७ आरोग्य कर्मचारी व २७ आरोग्य सेविका व ८ औषध निर्माते या पालखीसमवेत राहणार आहेत. अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. के. आडकेकर यांनी या मार्गावरील सणसर, लासुर्णे, निमगाव केतकी, बावडा, निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना व इंदापूरच्या ग्रामीण रुग्णालयाला २६ जूनला भेटी देऊन आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला व पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना द्यावयाच्या सेवेविषयी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.