पैठण-पंढरपूर रस्त्याची दुरवस्था; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
शिरूर कासार - पैठण-पंढरपूर रस्त्याची दुरवस्था झाल्याने पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना खड्ड्यांतूनच पंढरीची वाट शोधावी लागणार आहे.
वारकऱ्यांची होत असणारी ससेहोलपट लक्षात घेऊन राज्य शासनाने 1998 मध्ये पैठण ते पंढरपूर रस्त्याचे काम विशेष निधीतून केले होते.हा पालखी मार्ग औरंगाबाद, नगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या सीमा हद्दीतून जातो. शिरूर तालुक्यातून पंढरीकडे मार्गस्थ होत असणाऱ्या पैठण-पंढरपूर पालखी मार्गाची खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा न मिळाल्यामुळे आणि राज्य शासनाकडून डागडुजीसाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून या मार्गाची उपेक्षाच होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा हद्दीमुळे हा मार्ग खड्ड्यांत हरवला आहे. हा मार्ग राज्यातील दळणवळण व्यवस्थेसाठी अतिशय सोपा असून, या मार्गास राज्यमार्गाचा दर्जा देण्यात यावा व पुढील काळात पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची वाट सुखद व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.