बेल्हे - आणे (ता. जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे आज ता. २९ रोजी सकाळी टाळ - मृदंगाच्या गजरात अतिशय भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दरम्यान, वडगाव दर्या - राशीन - टेंभुर्णीमार्गे हा पायी दिंडी सोहळा ता. ११ जुलै रोजी पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे.

श्रीक्षेत्र आणे ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे नेतृत्व रामदास महाराज दाते (अण्णा) करीत आहेत. या पायी दिंडी सोहळ्यामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी आणे पंचक्रोशी, मुंबईकर भाविक मंडळींचा सहभाग आहे. या दिंडी सोहळ्यासाठी राणू रामजी दाते यांनी ट्रक सुविधा, श्रीप्रकाश बोरा यांनी पाण्याचा टॅंकर, तर बबन तुकाराम गांडाळ यांनी ट्रॅक्‍टरसेवा विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, चांगुणाबाई दाते, वसंत तुकाराम आहेर, बाबाजी दाते, जालिंदर नेहे, विष्णुबुवा आहेर, इटकाई देवस्थान आदींच्या आर्थिक सहकार्याने आकर्षक रथ तयार करण्यात आला आहे, तर माजी सरपंच विलास दाते यांनी वारकऱ्यांना पावसापासून संरक्षणासाठी प्लॅस्टिक मॅट, घोंगड्यांचे मोफत वाटप केले.