पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात प्रवेश होणार 

विलास काटे - सकाळ वृत्तसेवा 

वाल्हे - महर्षी वाल्मीकींची तपोभूमी असलेल्या वाल्हे गावात घरोघरी गुढ्या-तोरणे उभारून माउलींच्या पालखीचे आज उत्साहात स्वागत करण्यात आले. गर्द हिरव्या वनराईच्या सान्निध्यात भगव्या पताका उंचावून हरिनामाचे गोडवे गात वारकऱ्यांनी वाटचाल केली. शुक्रवारी (ता. १) पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

माउलींचा पालखी सोहळा सकाळी साडेसहाच्या सुमारास मल्हारनगरीतून बाहेर पडला. औद्योगिक विभागातून सोहळा बाहेर पडल्यानंतर न्याहारीसाठी दौंडजच्या खिंडीत अर्धा तास थांबला. हिरव्या गार माळरानात भक्तिरसाबरोबर निसर्गाचाही आस्वाद घेतला. पुढे दौंडज ग्रामस्थांच्या वतीने माउलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. 
वाल्हे गावचा परिसर भाजीपाला पिकविणारा म्हणून ओळखला जातो. बागायती मळे पाहून विठुरायाचा भक्त संत सावता माळी यांची आठवण होते. "कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी' असा संत सावतांचा अभंग वारकरी गात होते. 

वाल्ह्याच्या सीमेपासून ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतली. रांगोळ्यांच्या पायघड्या आणि गुढ्या उभारून पालखीचे स्वागत करण्यात आले. गावातून पालखी जाताना ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर पालखी पुन्हा रथात ठेवण्यात आली. साडेबाराच्या सुमारास पालखी तळावर पोचली. तळावर क्रमांकानुसार दिंड्या लागल्या. गर्दीतून वाट काढीत पालखी मधोमध आली. त्या वेळी दिंड्यांमध्ये भजन सुरू होते. राजाभाऊ चोपदार यांनी चोप उंचावताच दिंड्यांमध्ये शांतता पसरली. एका  दिंडीने टाळ सुरूच ठेवले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही टाळ वाजविणे बंद केले. त्यानंतर परिसरात सर्वत्र शांतता पसरली. परंपरेप्रमाणे चोपदारांनी आवश्‍यक त्या सूचना दिल्या अन्‌ समाजआरती झाली. दुपारचे जेवण घेऊन वारकऱ्यांनी विसावा घेतला. सायंकाळी दिंड्यांमध्ये प्रवचन, कीर्तन सुरू होते.