पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पिंपरीतील एच. ए. मैदानावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता होणार असल्याचे महापौर योगेश बहल, पालखी सोहळाप्रमुख संजय मोरे, नितीन मोरे, बाळासाहेब मोरे यांनी मंगळवारी जाहीर केले. या निर्णयामुळे पालखी सोहळ्याच्या सव्वातीनशे वर्षांच्या परंपरेत रिंगण सोहळा अनुभवण्याची पहिलीच संधी उद्योगनगरीतील भाविकांना मिळणार आहे.

तिथीमध्ये वाढ झाल्याने यंदा उद्योगनगरीतील मुक्कामही वाढला आहे. वाढीव तिथीला पिंपरीतील संत तुकारामनगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरात शुक्रवारी पालखीचा मुक्काम राहणार आहे. त्यामुळे एच. ए. मैदानावर गोल रिंगण घेण्याची विनंती महापौर योगेश बहल आणि आमदार विलास लांडे यांनी देहू संस्थान व पालखी सोहळाप्रमुखांकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पालखी सोहळाप्रमुख संजय मोरे, बाळासाहेब मोरे, नितीन मोरे, रामभाऊ मोरे, महापौर योगेश बहल, सहायक पोलिस आयुक्त सुधीर चौगुले यांनी मंगळवारी मैदानाची पाहणी केली; तसेच महापालिका भवनात सोहळाप्रमुख व महापौरांची बैठक झाली. त्यानंतर गोल रिंगण सोहळा शुक्रवारी घेण्याचे त्यांनी जाहीर केले.

महापौर बहल म्हणाले, "पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होणे ही शहरासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी पालिकेने पूर्ण तयारी केली असून, सुरक्षिततेसाठी मैदानावर पाच ठिकाणी उंच मनोरे उभारण्यात येणार आहेत.'' पालखी सोहळाप्रमुख संजय मोरे म्हणाले, "दर वर्षी बेलवडी, इंदापूर व अकलूज येथे गोल रिंगण होत होते. यंदा प्रथमच पिंपरीत रिंगण होत आहे. यापूर्वी एकदा पुण्यात रिंगण झाले होते. या सोहळ्यासाठी पालिकेने जागा व सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी सर्व दिंड्यांना रिंगण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.''

बाळासाहेब मोरे म्हणाले, "आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी सात वाजता मालक दिंडीच्या वतीने कीर्तन होईल. अकरा वाजता पालखी पिंपरीकडे मार्गस्थ होईल. चिंचवड स्टेशन व पिंपरी चौकात पंधरा मिनिटे आणि एच. ए. कॉलनी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात एक तास पालखीची विश्रांती होईल. त्यानंतर एच. ए. कंपनी मैदानात रिंगण सोहळ्यासाठी पालखी पोचेल.''