पिंपरी पालिका देणार दिंड्यांना सतरंजी भेट
Posted by सकाळ वृत्तसेवा on Tuesday, June 21, 2011
Under: News

पिंपरी - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी दिंड्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा पिंपरी-चिंचवड महापालिकेने चौदा वर्षांपासून जोपासली आहे. या वर्षी सतरंजी वाटप करण्यात येणार असल्याचे महापौर योगेश बहल यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी दिंड्यांना गुरुवारी (ता. 23) निगडीतील भक्तिशक्ती चौकात, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांना शनिवारी (ता. 25) दिघीतील मॅगझीन चौकात सतरंजी वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी पालखी सोहळाप्रमुखांकडे पास देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दिंड्यांना वाटप केलेले पास दिंडीप्रमुखांनी पालिकेच्या स्वागत कक्षात जमा करून सतरंजी घेऊन जावी, असे आवाहन बहल यांनी केले आहे.
पालखी सोहळ्यामध्ये सहभागी दिंड्यांना भेट वस्तू देण्याची परंपरा पालिकेने 1998 पासून जोपासली आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज वैकुंठगमन स्मृतिचिन्ह, पखवाज, टाळजोडी, तुकारामगाथा, संत तुकाराम महाराज व टाळकरी छायाचित्र, सतरंज्या, ज्ञानेश्वरी ग्रंथ व खोळ, केरोसीन बत्ती, प्लॅस्टिक खोळ, तंबू, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज मूर्ती, विठ्ठल मूर्ती भेट देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ऐश्वर्याची वचनाक्षरे ग्रंथ भेट देऊन दिंडी प्रमुखांचा गौरव करण्यात आला होता. हीच परंपरा यंदाही पालिकेने कायम ठेवली आहे.
In : News