आजपासून अंमलबजावणी; शनिवारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखीचे गुरुवारी (ता. २३) पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होणार असून, दोन दिवस मुक्काम राहणार आहे. शनिवारी (ता. २५) पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत बदल केला आहे.
गुरुवारी दुपारी दोन ते पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आकुर्डीतील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात जाईपर्यंत आणि शुक्रवारी आकुर्डी येथून पिंपरीतील संत तुकारामनगर येथील मुक्कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत रहदारीत पुढील बदल केले आहेत.

हे मार्ग बंद राहतील

देहू फाटा ते निगडीतील टिळक चौकातून पालखी मार्गस्थ होईपर्यंत पुणे-मुंबई महामार्ग. दुपारी दोन ते सायंकाळी सहापर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबामाळपर्यंत ग्रेडसेपरेटर व पुण्याकडे जाणारा सेवा रस्ता. आवश्‍यकतेनुसार टिळक चौक - गोकूळ चौक - दत्तवाडी - आकुर्डी पालखी तळ रस्ता. शुक्रवारी (ता. २४) पहाटे चारपासून खंडोबा माळ ते नाशिक फाट्यापर्यंत पुण्याकडे येणारा सेवा रस्ता. शनिवारी वल्लभनगरपासून दापोडीपर्यंत पुण्याकडे येणारा सेवा रस्ता. पुण्याहून नाशिककडे जाणारी वाहतूक आणि पालखी नाशिक फाट्यावरून पुढे गेल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक टप्प्याने बंद केली जाईल. भोसरी - आळंदी आणि मोशी - आळंदी हे रस्तेही शनिवारी पहाटे तीनपासून रहदारीस बंद राहतील.

पालखी काळात पर्यायी मार्ग

गुरुवार व शुक्रवारी - देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्ता, भक्ती-शक्ती चौक - स्पाइन रस्ता - थरमॅक्‍स - खंडोबा माळ किंवा टेल्को रस्त्याने भोसरी - नाशिक फाटा, प्राधिकरण - बिजलीनगर - चापेकर चौक - चिंचवड स्टेशन, खंडोबा माळ - थरमॅक्‍स चौक - त्रिवेणीनगर - देहूरोड.
शनिवारी ः नाशिक रस्त्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पांजरपोळ चौक - केएसबी चौक - चिंचवड स्टेशन - डांगे चौक, पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांसाठी भक्ती-शक्ती चौक - त्रिवेणीनगर - चिखली - मोशी.