ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे उद्या नीरा स्नान

नीरा - नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १) येत आहे. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान येथे पार पडेल. सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती सरपंच राजेश काकडे व ग्रामसेवक डी. टी. लोणकर यांनी दिली.

आळंदीहून निघालेला पालखी सोहळा माउलींचा या पादुका स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विविध मान्यवरांची, अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. पुणे जिल्ह्यातून पालखीला निरोप देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहतात. नीरा नदीच्या पलीकडील तीरावर सातारा जिल्ह्यातील अधिकारी-पदाधिकारी सोहळ्याचे स्वागत करतात. त्यामुळे येथे सोहळ्याला अलोट गर्दी लोटते. सोहळ्याला होणारी गर्दी विचारात घेऊन ग्रामपंचायतीने नियोजन केल्याचे श्री. काकडे यांनी सांगितले.

नीरेमध्ये पालखी विसावा तळाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तेथील परिसराची स्वच्छता आठ दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. गावातील गटारांची स्वच्छता करून त्यामध्ये पावडर टाकण्यात आली आहे. डासांचा उपद्रव होऊ नये, साथीच्या आजाराला अटकाव व्हावा, यासाठी सर्वत्र धुरळणी करण्यात आली आहे. पुणे-पंढरपूर मुख्य मार्गावरील साईडपट्ट्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरूम टाकण्यात आला आहे. नीरा ग्रामपंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण केली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी पाइपलाइन फुटली होती. तेथे दुरुस्ती करण्यात आली असून, मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे.

बाजारतळ परिसरातही स्वच्छतेची कामे पूर्ण करून मुरूम टाकून घेण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी मुख्य मार्गावर सात ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नळकोंडाळी सुरू करण्यात आली आहेत. पालखी सोहळ्यातील टॅंकर पाण्याने भरून देण्याची व्यवस्था नीरेतील जलशुद्धीकरण केंद्रावर करण्यात आली आहे. विविध समाजसेवी संस्थांकडूनही पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. वारकऱ्यांना अन्नदान करण्याबरोबरच कोणत्याही बाबीची कमी पडू नये, अशा प्रकारचे नियोजन परिसरात होत असल्याचे श्री. काकडे यांनी स्पष्ट केले.