हडपसर - संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी नऊच्या सुमारास, तर संत तुकाराम महाराजांची पालखी अकरा वाजण्याच्या सुमारास विसावास्थळी पोचली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी साडेअकराच्या सुमारास सासवडकडे, तर तुकाराम महाराजांची पालखी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लोणीकाळभोरकडे प्रस्थान ठेवले. आमदार महादेव बाबर, जगन्नाथ शेवाळे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, नगरसेवक दत्तोबा ससाणे, सुलोचना तुपे, विजय देशमुख, नाना वाडेकर यांनी पालखीचे स्वागत केले. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवला होता. हडपसर रोटरी क्‍लबच्या वतीने वारकऱ्यांना तंबू व रेनकोटचे वाटप करण्यात आल्याची माहिती सचिव नंदू जगताप व मामा तुपे यांनी दिली. पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटनेच्या वतीने बाळासाहेब भिसे यांनी फराळ वाटप केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आबा तुपे, माउली कुडले यांनी फराळ वाटप केले. अखिल भारतीय पोलिस फ्रेन्ड्‌स परिषदेच्या वतीने रतन माळी, रवींद्र वाघ यांनी पालखी मार्गाची स्वच्छता केली.

शिवसेना गाडीतळ शाखेच्या वतीने नाना भानगिरे, शिरीष कोल्हटकर यांनी पाण्याच्या बाटल्या वाटल्या. नवरत्न सेवा श्री ट्रस्टच्या वतीने झेंडूबाब व तुळशीची रोपे वाटण्यात आली. राष्ट्रवादी व शहीद भगतसिंग एज्युकेशन प्रतिष्ठानच्या वतीने विजय मोरे यांनी खिचडी वाटप केली. शहीद भगतसिंग ट्रस्टच्या वतीने गोपीनाथ पवार व त्यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.
श्रीगणेश मित्रमंडळ, श्रीगजानन मित्रमंडळ, विजय मित्रमंडळ, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत करून फळे व खिचडीचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी भाडळे, सुरेश हडदरे, युवराज मोरे, सविता मोरे यांनी फळ वाटप, तसेच शिवसेनेच्या वतीने पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.

महेश पुंडे मित्र परिवार व नागरी संरक्षण दल यांच्या वतीने वानवडी येथे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.

फुरसुंगीत स्वागत

पुणे शहर हद्दीतून जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश केलेल्या संत ज्ञानदेवांच्या पालखीचे फुरसुंगीत हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. हडपसर येथून संत तुकारामांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरकडे रवाना होते, तर संत ज्ञानदेवांची पालखी सासवड रस्त्याने येऊन फुरसुंगी येथे शहर हद्द सोडून जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करते. भेकराईनगर येथे फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. पावसाच्या धारा झेलत माउलींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची एकच झुंबड उडाली होती.फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व दिंडीप्रमुख, पालखीप्रमुखांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी फुरसुंगीच्या सरपंच विजया टिळेकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्यप्रमुख डॉ. सुधाकर कोकणे, पंचायत समितीचे उपसभापती नामदेव खुटवड, उपसरपंच संजय हरपळे यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

दिवेघाटाची अवघड चढण चढण्यासाठी पालखीला अप्पासाहेब खुटवड यांची "सर्जा-राजा' ही बैलजोडी व अन्य शेतकऱ्यांच्या बैलजोड्या जोडण्यात आल्या. लाखो वारकऱ्यांच्या "माउली-माउलीं'च्या जयघोषात, विठ्ठलनामाच्या साथीने हा अत्यंत अवघड घाट लीलया पार करून संत ज्ञानदेवांची पालखी पुढे सासवड मुक्कामासाठी रवाना झाली.