इंद्रायणीकाठी वैष्णवांचा महापूर; राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दिंड्या दाखल

आळंदी - गेल्या दोन दिवसांपासून टाळमृदंगाच्या गजरात, माउलींच्या नामघोषात राज्याच्या कानाकोपऱ्यांतील दिंड्या, वारकरी आळंदीत दाखल झाले असून, इंद्रायणीचा तीर भाविकांनी फुलून गेला आहे. माउलींची पालखी उद्या ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. २२) रात्री उशिरा प्रस्थान ठेवणार आहे.
टाळमृदंगाच्या साथीने माउलींच्या विठुनामाचा गजर करत वैष्णव ठिकठिकाणांहून विठ्ठलभक्तीने प्रेरित होऊन वारीसाठी येथे येताना दिसत आहेत. भाविकांच्या गर्दीने इंद्रायणीचा तीर आज पहाटेपासूनच फुलला होता. आंद्रा धरणातून पाणी सोडल्याने इंद्रायणीला मुबलक पाणी आले आहे.

मंदिरातून बाहेर जाण्यासाठी महाद्वाराचा वापर करण्यात येणार आहे. मंदिराच्या पान दरवाजातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. दुपारपर्यंत ही रांग इंद्रायणीचा भक्ती सोपान पूल ओलांडून पुढे गेली होती. भाविकांच्या सकाळच्या महापूजा साडेबारापर्यंत सुरू होत्या. त्यानंतर माउलींना दुपारचा नैवेद्य झाला. या वेळी दर्शन बंद ठेवले होते.
दुपारनंतर पुन्हा दर्शनबारी चालू करण्यात आली. दिवसभरात हजारो भाविक माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत धन्य झाल्याची भावना व्यक्त करत होते. मंदिर परिसरात महिला भाविक फुगड्या, फेर धरून भक्तिरसात न्हाऊन निघाल्या होत्या.

दरम्यान, बहुतांश वारकऱ्यांनी देहूमधील जगत्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावली. दुपारनंतर मात्र आळंदीत भाविकांचा ओघ वाढला होता. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली होती.

उद्याच्या बंदोबस्ताबाबत माहिती देताना सहायक पोलिस निरीक्षक बापूराव देशमुख यांनी सांगितले, ""उद्या रात्री साडेनऊनंतर प्रत्यक्ष प्रस्थानाच्या वेळी चावडी चौक, भराव रस्ता, पालिका चौकातून मंदिराकडे जाण्यास बंदी करण्यात येणार आहे. मंदिरातील दिंड्या आणि माउलींची पालखी बाहेर पडल्यावर रात्री उशिरानंतर भाविकांना मंदिराकडे जाण्यास प्रवेश दिला जाईल, तर प्रस्थानासाठी स्थानिक खांदेकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा ठेवत केवळ दीडशे कार्यकर्त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दिंडीतील वारकऱ्यांची संख्याही कमी करण्यात येणार आहे.''

असा असेल प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम

पहाटे पावणेतीन ते साडेचार - घंटानाद, पवमान अभिषेक
साडेचार ते दुपारी बारा - भाविकांच्या महापूजा व समाधी दर्शन
दुपारी बारा ते साडेबारा - श्रींना नैवेद्य, दर्शन बंद
दुपारी साडेबारा ते तीन - दर्शन चालू
दुपारी तीन ते सव्वातीन - माउलींचा पोशाख, दर्शन बंद
दुपारी सव्वातीन ते सात - दर्शन चालू
रात्री सात ते साडेसात - गुरुवार पालखीसाठी माउलींना पोशाख
रात्री साडेसात ते दहा - गुरुवारनिमित्त पालखी मंदिर प्रदक्षिणा, चोपदारांच्या वतीने आरती
रात्री दहा - प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ व दिंड्यांना प्रवेश
रात्री दहा ते एक - पालखीचे मंदिरातून आजोळघराकडे प्रस्थान
रात्री एकनंतर - आजोळघरी जागर, दर्शन चालू
शुक्रवारी (ता. २४) - आजोळघरी दिवसभर दर्शन चालू