गुरुकृपा सत्संग मंडळाची विनंती

नगर - आषाढी एकादशीनिमित्त नगरमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या विविध दिंड्यांतील वारकऱ्यांनी नगरमध्ये मुक्काम करावयाचा नसल्यास पोलिस अधीक्षक चौकातून भुईकोट किल्लामार्गे सोलापूर रस्त्याकडे जावे, अशी विनंती गुरुकृपा सत्संग मंडळाने केली आहे. यातून अपघात टाळून वारकऱ्यांना सुरक्षित प्रवासही करता येणार असल्याने वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात दिंड्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गुरुकृपा सत्संग मंडळाचे सदस्य नंदलाल जोशी, प्रा. अनिल होनराव, अशोक जोशी, डहाळे, पुणतांबेकर, गोविंद जोशी आदींनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. नगरमधून दरवर्षी नाशिक, औरंगाबाद, जळगाव, मुक्ताईनगर परिसरातील दिंड्या नगर शहरात येताना पत्रकार चौक, पोलिस अधीक्षक चौक, नटराज हॉटेल, अशोका हॉटेल, स्टेट बॅंक चौकमार्गे चांदणी चौकात सोलापूर रस्त्याकडे जातात. मात्र, शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या या महामार्गावर जड, तसेच अन्य छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक असल्याने अपघाताची शक्‍यता असते. त्यामुळे वारकऱ्यांनी मनमाड रस्त्याने आल्यास पत्रकार चौकातून पोलिस अधीक्षक चौकाकडे व औरंगाबाद रस्त्याने आलेल्यांनी पोलिस अधीक्षक चौकातून एसी डेपो व रेकॉर्ड ऑफिससमोरून भुईकोट किल्ला- एमआयएस क्‍लब चौकातून सेक्रेड हार्ट शाळेच्या पाठीमागून सोलापूर रस्त्यावर गेल्यास एक ते दीड किलोमीटरने पायी अंतर कमी होईल, असे सत्संग मंडळाचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिसांनी यादृष्टीने शहरात येणाऱ्या दिंड्यांना मार्गदर्शन केल्यास वारकऱ्यांची मार्गक्रमणा सुरक्षित होईल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.