थोरल्या पादुका मंदिरात स्वागताची तयारी
Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011
Under: News
दिघी - थोरल्या पादुका मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शनिवारी (ता.२५) सकाळी पालखी येथे आल्यानतंर या मंदिरात काही काळ थांबणार आहे.
माऊलीची पालखी पंढरपुरास पुणे-आंऴदीमार्गे जाते. त्यावेळी पालखी काही वेळ थोरल्या पादुका मंदिरात थांबते. तेथे माऊलींच्या पालखीचे जोरदार स्वागत होते. या ठिकाणी पालखी आल्यानंतर माऊलींची आरती करण्यात येते. यावेळी येथे भाविक मोठ्या संख्येने हजर असतात.
दिघी-मॅगझिन चौकात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीनेही पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे येथे मोठा मंडप उभारण्यात आला आहे. यावेळी महापौर योगेश बहल, आयुक्त अशिष शर्मा, आमदार विलास लांडे, सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महापालिकेच्या वतीने यंदा दिंडी प्रमुखांना संतरजी वाटप करण्यात येणार आहे. स्थापत्य विभागाच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्टया व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम जोरात सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या वारक-यांना त्रास होऊ नये, म्हणून ठीकठीकाणी संरक्षक कठडे उभारण्यात आले आहे. बंद पडलेले पथदिवेही दुरूस्त करण्यात आले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पालखीतील वारक-यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅकरची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुणे आळंदी मार्गावर विविध सामाजिक संस्था, मंडळे, पतसंस्था व नागरिकांच्या वतीने पालखीतील सहभागी भाविकांकरिता अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
In : News