देहू - आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता.२२) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळा प्रस्थानाच्या वेळी मुख्य देऊळवाड्याच्या महाद्वारातून दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाच्यावेळी मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपात होणारी गर्दी टाळण्यासाठी केवळ दिंडी प्रमुख, विणेकरी, सेवेकरी आणि प्रमुख पाहुण्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. भजनी मंडपात होणारी गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख बाळासाहेब मोरे, नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांनी केले आहे.

पालखी प्रस्थान कार्यक्रम बुधवारी असल्याने इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलला असून, अनेक दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत. पालखी सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानची लगबग सुरू होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक पालखी सोहळा प्रस्थानासाठी येथे दाखल झाले आहेत. मुख्य देऊळवाड्यात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनबारीतून भाविकांना विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात प्रवेश देण्यात आला. दुपारी पावसाने हजेरी लावली. देऊळवाड्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाद्वार, पानदरवाजा, तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वाराजवळही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी सोहळा प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली आहे.

याबाबत सोहळा प्रमुख बाळासाहेब मोरे यांनी सांगितले, की बुधवारी सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुकांची पूजा होईल. मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपात दुपारी अडीच वाजता पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमास सुरवात होईल. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापूजा, आरती होईल. त्यानंतर विणेकरी, सेवेकरी यांचा सत्कार करण्यात येईल. दर वर्षी भजनी मंडपात प्रस्थानच्या वेळी गर्दी होते. भजनी मंडपातील जागा कमी पडत असल्याने गर्दीवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे यंदा प्रमुख पाहुणे, विणेकरी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश देण्यात येणार असून, दर्शनबारीतून भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.