सकाळ वृत्तसेवा
देहू - टाळ-मृदंगाच्या तालावर विठूनामाचा गजर... ज्ञानोबा-तुकारामांचा नामघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढीवारीसाठी आलेल्या हजारो भाविकांनी बुधवारी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवला. 

सावळ्या विठूच्या आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या नामघोषाने देहूनगरी दुमदुमली. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. ऊन-सावलीच्या लपंडावाने हवेत गारवा होता. हातात भगव्या पताका आणि पावसाच्या हलक्‍या सरी अंगावर घेत बुधवारी पहाटे पाचपासून मुख्य देऊळवाड्याजवळ भाविक, दिंडीकऱ्यांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मुख्य देऊळवाड्याकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. देऊळवाड्यातील पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमानंतर देऊळवाड्याबाहेर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देऊळवाड्यातून पालखी बाहेर आल्यानंतर भाविकांनी केलेल्या तुकाराम तुकाराम... नामघोषाने देहूनगरी दुमदुमली. 

आषाढीवारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा बुधवारी येथे झाला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक एक दिवस अगोदरच देहूनगरीत दाखल झाले होते; तर वारीतील दिंड्याही आल्या होत्या. पावसाने काही वेळ उघडीप दिल्याने वारकऱ्यांनी शेतात राहुट्या आणि तंबू उभारले होते. बुधवारी पहाटे आणि दुपारपर्यंतही अनेक दिंड्या दाखल होत होत्या. इंद्रायणी नदीत स्नान करून पहाटे पाचपासून भाविकांनी मुख्य देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्‍मिणी आणि संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दर्शनासाठी दर्शनबारीतून मंदिरात प्रवेश देण्यात येत होता. संत तुकाराम महाराजांच्या घरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आकर्षक आणि सुगंधी फुलांनी सजावट केलेल्या देऊळवाड्याच्या महाद्वारातून एकावेळी एका दिंडीला प्रवेश देण्यात आला.

पोलिसांच्या बंदोबस्तामुळे छावणीचे रूप आले होते. पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रमास दुपारी दोनच्या सुमारास सुरवात झाली. मंदिरात पारंपरिक पूजा झाली. देऊळवाड्याबाहेर भाविकांच्या मोठ्या गर्दीत टाळ-मृदंगांचा गजर आणि तुकारामांचा नामघोष सुरू होता. सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. देऊळवाड्यासमोर गर्दी होऊ नये, यासाठी मंदिरासमोरील प्रसादाची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दुपारी आकाशात ढग आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. या सोहळ्यात मान्यवरांनी हजेरी लावली. पालखी सोहळा प्रमुख बाळासाहेब मोरे, नितीन महाराज मोरे, संजय मोरे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, विश्‍वस्त सूर्यकांत मोरे, विश्वजित मोरे, राजेंद्र मोरे, बापूसाहेब देहूकर, रामभाऊ मोरे, संभाजी महाराज मोरे आदींनी स्वागत केले.

ग्रामस्थांकडून अन्नदान

या सोहळ्यात आलेल्या भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांची लगबग सुरू होती. येथील संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, नवशा गणपती मित्र मंडळाच्या वतीने भाविकांना अन्नदान करण्यात आले. येथील हनुमान मंदिरात भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात देहूतील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पांडे मित्रपरिवाराच्या वतीने सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मोफत दाढी-कटिंगची सोय करण्यात आली. अनिल पांडे, रामदास पांडे, संजय पांडे व त्यांचे मित्र यात सहभागी झाले होते. इंद्रायणी माता सेवा संघाच्या वतीने इंद्रायणीची आरती करण्यात आली. माजी आमदार रूपलेखा ढोरे, आमदार बच्चू कडू, सुहास गोलांडे, माया ब्रह्मे, गणपतराव कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. प्रहार संघटनेच्या वतीने वारीत रुग्णांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. विष्णुपंत नेवाळे, सुहास गोलांडे, विलास राऊत आदी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांसाठी मुख्य देऊळवाडा, गाथा मंदिर आणि वैकुंठस्थान येथे बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला होता. पीएमपीएल आणि एसटीच्या बस गावाबाहेर थांबविण्यात आल्या होत्या.