वारकऱ्यांच्या सेवेची दालने गुरुवारपासूनच सजली

बारामती - संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती नगरी सज्ज झाली असून, ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह वारकऱ्यांच्या सेवेची विविध दालने गुरुवारपासूनच सजलेली होती. शुक्रवारी (ता. 1) तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामतीत मुक्काम आहे.

बारामती शहरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पालखीचे आगमन होते. शहराच्या वेशीवर नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, उपनगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह नगरसेवक, शासकीय अधिकारी व मान्यवर पालखीचे स्वागत करतील. यंदाही पांढरीच्या महादेवाच्या मंदिरानजीक बारामती नगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत केले जाणार आहे. 

नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी वीणेकऱ्यांचा नारळ व पुष्पहार देऊन स्वागत केले जाते, यंदाही अशाच पद्धतीने स्वागत केले जाणार आहे.
दरम्यान, पालखीमार्गावरील दुरुस्ती व डागडुजीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली असून, वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेतली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विजयसिंह देशमुख व मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली. पालखी काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नामदेव मिट्टेवाड व पोलिस निरीक्षक गणेश मोरे यांनी दिली. शहरात स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आली असून, वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करून देण्यात आली आहे.

वारकऱ्यांसाठी अभिनव कार्ड

 बारामतीचे उपविभागीय अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी यंदा दिंडीप्रमुखांना केरोसीन व गॅस सिलिंडरची अडचण होऊ नये, यासाठी स्वतंत्र कार्डच छापून दिले आहे. यात दौंड, बारामती व इंदापूर तिन्ही तालुक्‍यातील स्वस्त धान्य दुकानदार व गॅसविक्रेत्यांचे दूरध्वनी क्रमांक व त्यांचे पत्ते टाकण्यात आले आहेत. या कार्डवर किती लिटर केरोसीन वाटप झाले व किती गॅस सिलिंडर वाटप झाले याची माहिती भरून द्यायची आहे. या मुळे दिंडीप्रमुखांची सोय होणार आहे.