उंडवडी -: जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज (ता. ३०) रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दौंड तालुका पार करून बारामती तालुक्‍यात प्रवेश केला. या पालखी सोहळ्याचे तालुक्‍यातील पदाधिकारी व भाविकांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. स्वागतानंतर भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे मुक्कामी विसावला.

जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळाने दौंड तालुक्‍यातील अवघड रोटी घाट पार करून बारामती तालुक्‍यात प्रवेश केला. या पालखी सोहळ्याचे कारखेल हद्दीतील खराडेवाडी नजीक (गुंजखिळा) येथे तालुक्‍याच्या वतीने बारामती पंचायत समितीचे सभापती अविनाश गोफणे, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, गटविकास अधिकारी विवेक इलमे, तहसीलदार हिंमत खराडे यांनी प्रथम स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य बी. के. हिरवे, उपसभापती प्रभावती काटे, उपविभागीय पोलिस अधिकारी नामदेव मिठेवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, कारखेलच्या सरपंच नलिनी भापकर, उपसरपंच अनिल भोसले, उंडवडी सुपेच्या सरपंच लता गवळी, उपसरपंच भरत जगताप व विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळ्याचे फटाके वाजवून स्वागत करण्यात आले, तसेच या सोहळ्याच्या स्वागतासाठी कारखेल व उंडवडी सुपे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. उंडवडी सुपे येथे पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथे आरती करून गेनबा तुकारामाचा गजर करीत पालखी विसावली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, साबळेवाडी, जराडवाडी, शिर्सुफळ, देऊळगाव रसाळ आदी गावातील भाविकांनी गर्दी केली होती.