आकुर्डी - कधी रखरखते ऊन, कधी मेघांची सावली अन्‌ मध्येच पावसाचा तुरळक शिडकावा अशा निसर्गाने रंगवलेल्या खेळात दंग होत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची पहिल्या दिवसाची वाटचाल गुरुवारी सरली. पाणावलेल्या डोळ्यांनी देहूकरांचा निरोप घेऊन निघालेल्या पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सोहळा मुक्कामी पोचला.


स्नान इंद्रायणीत करून 

वैष्णव जन धन्य झाले 

द्वैतभाव विसरून सारा 

पाऊले पंढरीस निघाले 


या ओळींप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी गुरुवारी भल्या पहाटेच इंद्रायणीत स्नान केले. देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर व शिळा मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांची पाऊले संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाचे ठिकाण इनामदारसाहेब वाड्याकडे वळली. रात्री वाड्यामध्ये खणेपुरीकर दिंडीच्या वतीने कीर्तन व म्हातारबुवा पाथ्रुडकर दिंडीच्या वतीने जागर झाला.


गुरुवारी पहाटे काकड आरती झाली. सकाळी गोळेगावकर दिंडीच्या वतीने कीर्तन झाले. त्यानंतर पादुका पूजन झाले. संस्थानचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, सोहळा प्रमुख बाळासाहेब मोरे, संजय मोरे, नितीन मोरे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र मोरे, विश्‍वजित मोरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी विकास देशमुख व पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी सपत्निक दर्शन घेतले. अकराच्या सुमारास पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. देहूकरांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. 

देहूगावाबाहेर हजरत सय्यद अनगडशाह बाबा दर्ग्याजवळ पालखी रथ थांबविण्यात आला होता. इनामदारसाहेब वाड्यापासून दर्ग्यापर्यंत पालखी खांद्यावर आणली. "संत भार पंढरीचा।' आणि "संताचिये पायी। हा माझा विश्‍वास।' हे अभंग आणि संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. देहू संस्थान व पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी रथात ठेवण्यात आली. पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पादुकासह दर्ग्याचेही भाविकांनी दर्शन घेतले. हळूहळू दिंड्या व पालखी रथ पुढे-पुढे सरकत होता. झेंडेमळा येथे भाविकांनी पुष्पवृटी केली.

चिंचोलीतील पादुका मंदिरासमोर अभंग आरती व दुपारची विश्रांती झाली. किन्हई ग्रामस्थ व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने येथे पालखीचे स्वागत केले. चिंचोलीच्या विस्तीर्ण माळरानावर वारकरी विसावले होते. भोजनाबरोबरच भजनही रंगले. भारूड व गवळणींचे सुर कानी पडत होते. जणू भक्तीचा मळाच फुलला होता. अर्ध्यातासाच्या विश्रांतीनंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला. मुंबई-पुणे महामार्गावर देहूफाटा येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास सोहळा पोचला. देहूरोड, किवळे, मामुर्डी, विकासनगर, सोमाटणे येथील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर पालखीची वाटचाल महामार्गाने झाली. दोन्ही बाजूला लष्करी विभागाची विविध कार्यालये व दाडझाडीतून सोहळा पुढे सरकत होता.

सायंकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत पोचला. महापालिकेच्या वतीने भक्तिशक्ती चौकात महापौर योगेश बहल व अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी स्वागत केले. गुरुवारच्या औद्योगिक सुटीमुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. निगडीतील टिळक चौकमार्गे सायंकाळी सोहळा आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात मुक्कामी पोचला. रात्री देशमुख दिंडीच्या वतीने कीर्तन झाले. शुक्रवारी पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे पालखीचा मुक्काम राहणार असून एच. ए. कंपनी मैदानावर पहिले गोल रिंगण होणार आहे.