मांडवगण फराटा - इनामगाव (ता. शिरूर) येथील श्री संत मुकिंदराज महाराज व श्री संत अनंत गोपाळदास महाराज पालखीचे आषाढी पायी वारीसाठी बुधवारी (ता.२९) प्रस्थान होणार असल्याची माहिती अशोक महाराज शिंदे यांनी दिली.

या वर्षी नव्यानेच या पालखी सोहळ्याची सुरवात करण्यात आली आहे. बाबाजी महाराज चाळक यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात येऊन दिंडीचे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यात इनामगाव, मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, वांगदरी, चिंभळा, तांदळी या भागातील वारकरी व भजनीमंडळे सहभागी होणार आहेत. सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सर्व सोय मोफत करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी वाहन व्यवस्था, तंबू, अन्नदान, आर्थिक सहकार्य इनामगाव ग्रामस्थांनी केले आहे. दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना इनामगाव येथील डॉक्‍टर्स वैद्यकीय सेवा मोफत पुरविणार आहेत.